शाळा–महाविद्यालयात संविधानाचे वाचन करा; राष्ट्रवादी युवककडून शिक्षण आयुक्तांना संविधान भेट

ncp youth wing protest for sanvidhan reading in collages maharashtra

पुणे: मुंबईमधील महाविद्यालयात भगवतगीता वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला टार्गेट केल्यानंतर, आता राज्यातील सर्व शाळा – महाविद्यालयात संविधानाचे वाचन करण्याची मागणी करण्यात येत आहे, आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून आंदोलन करत शिक्षण आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तसेच यावेळी संविधानाच्या प्रती शिक्षण आयुक्तांना भेट देण्यात आल्या आहेत.

यावेळी माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सुहास उभे, अमोघ ढमाले, भोला सिंग अरोरा, विक्रम मोरे, आकाश पवार, ऋषी परदेशी, अजिंक्य पालकर, निलेश जाधव, अमरजित सिंग यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील आठवड्यात मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवतगीतेचं वाटप करण्यावरुन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विरोधकांनी टार्गेट केल होत. महाविद्यालयांमध्ये भगवतगीता वाटप करून सरकारकडून शिक्षणाचे भगवीकरण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी गीता हा धर्मग्रंथ महाविद्यालयात वाटप करण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरु आहेत, गीतेबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र ते कोण करत आहेत त्यांचा उद्देश स्वच्छ नसतो, त्यामुळेच उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना संविधानाच्या प्रती दिल्या आहेत. यामागे सर्व शाळा – महाविद्यालयात संविधान पोहचवण्याचा उद्देश असल्याच माजी नगरसेवक रविंद माळवदकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आदर्श असणारे संविधान शेवटच्या घटकापर्यत पोहचणे गरजेच आहे, त्यामुळे राज्यातील सर्व शाळा – महाविद्यालयात संविधानाचे वाचन करण्यात यावं, यासाठी आपल्या संस्थेकडून शिक्षण विभागाला संविधानाच्या प्रती पुरवल्या जातील, असं सुहास उभे यांनी सांगितले.