काठेवाडीत पवारांचीच ‘पॉवर’; ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

सूनबाईंनी राखला सासऱ्यांचा गड

बारामती: महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणावर प्रभाव असणारे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होम ग्राउंड असणाऱ्या काठेवाडीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीवर सरपंच पदासह १४ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. सरपंच पदासाठी विद्याधर काटे यांनी १५०० मतांनी सहज विजय मिळवला.

गेली अनेक वर्षे बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा भाजप आणि रासपने राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केल होते. मात्र विरोधकांच आव्हान फुसके निघाल्याचे निकालावरून दिसून येत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशात सुनेत्रा पवार यांचे विशेष परिश्रम आहेत. काटेवाडी गावाच्या निवडणुकीकडे सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासून विशेष लक्ष दिले होते. पवार कुटूंबियांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडी गावात यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीचा चांगलाच धुरळा उडाला होता.

विजयानंतर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्याकी ‘ राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे काटेवाडीची देशाला ओळख झाली. स्वच्छता अभियानामुळे काटेवाडी देशाच्या आणि जगाच्या नकाशावर पोहोचले. आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून काटेवाडी गावात होत असलेल्या विकासकामांवर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. विरोधकांकडे या निवडणुकीत कोणतेच मुद्दे नव्हते. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक टीका केली. परंतु कार्यकर्त्यांनी संयमाने प्रचार करत जनतेपर्यंत केलेली कामं पोहीचवली. केलेल्या कामांचा आणि मतदारांच्या विश्वासाचा हा विजय आहे’.