fbpx

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या मतमोजणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : अजित पवार

ajit pawar

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- विधानपरिषद निवडणुकीच्या ६ पैकी ५ जागांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. मात्र लातूर-उस्मानाबाद-बीड जागेची मतमोजणी थांबविण्याचे आदेश आले आहेत. परंतु आम्हाला ती मतमोजणी करून घ्यायची आहे. त्यासाठी आम्ही औरंगाबाद न्यायालयात दाद मागितली आहे. वेळ पडल्यास दिल्लीतील निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाकडेही दाद मागणार असल्याचे  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी २८ मे ला पोट निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारसभेसाठी अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

विधानपरिषद निकालाबाबत बोलताना पवार म्हणाले, परभणी हिंगोली वगळता कोणत्याही ठिकाणी आम्हाला बहुमत नव्हते, पंरतु निवडणुकांना सामोरे हे जावेच लागते, या निवडणुकीमध्ये आम्हाला एकाच ठिकाणी यश मिळाले आहे. रायगडमध्ये संख्येने कमी असतानाही मित्र पक्षांनी चांगले सहकार्य केल्यानेच आम्हाला ती जागा प्रचंड बहुमताने जिंकता आली .  परभणी हिंगोली मतदार संघात निवडून आलेला उमेदार हा अकोल्याचा आहे. ही बाब देखील गंभीर असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.