fbpx

भंडारा-गोंदिया लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार; नाना पटोलेंच्या भूमिकेकडे लक्ष

भंडारा -गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसच लढणार असल्याच राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. पटेल यांनी ट्विटकरत या बद्दलची माहिती दिली. तसेच पक्ष नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचही पटेल यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजप खासदारकीचा राजीनामा देवून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले नाना पटोले आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करत नाना पटोले भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन असल्याचा आरोप करत पटोले यांनी भाजप खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे भंडारा -गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणुक होत आहे. नाना पटोले यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हि जागा कॉंग्रेस लढवेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पटेल यांनी केलेल्या दाव्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रफुल्ल पटेल यांचे ट्विट

पलूसमध्ये स्व. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा काँग्रेस लढविणार आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत पालघर येथील जागा काँग्रेस लढवेल, तर भंडारा-गोंदिया येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला असून या निर्णयावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.