‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’

nawab malik at ncp press

टीम महाराष्ट्र देशा – ‘डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा दुर्दैवी निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. मात्र २०१९ मध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यास डान्सबार बंद करण्याचे काम पक्षाकडून करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडल्याने न्यायालयाला नियम शिथिल करावे लागले. मुख्यमंत्री व बारमालक यांच्यात दोन वर्षापूर्वी बैठक घेण्यात आली होती, त्यातच हा निर्णय घेतला गेला असावा, असा अंदाज मलिक यांनी वर्तवला.

डोंबिवली येथील भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विदेशी शस्त्रसाठा मिळाला. सत्तेच्या जोरावर कुलकर्णी यांना फक्त ज्युडिशीयल कस्टडी देण्यात आली आहे. या गोष्टीत मलिक यांनी संशय वर्तवला आहे. मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा का बाळगला जात आहे, यावर पोलिस प्रशासन चौकशी का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत मलिक यांनी सरकारला धारेवर धरले.

दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईसह राज्यात डान्सबारची छमछम् पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डान्सबार मालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्र सरकारने डान्सबार परवान्यासाठी घातलेल्या जाचक अटी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, गरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.