राष्ट्रवादीला हवी आहे आमदार चव्हाण यांच्यासाठी औरंगाबाद लोकसभेची जागा

निलंगा /प्रा.प्रदीप मुरमे : आघाडीच्या जागा वाटपातील काँग्रेस पक्षाला सुटलेली ‘औरंगाबाद’लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठी वरीष्ठ पातळीवर आग्रही असून या मतदारसंघातून मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांना या आगामी लोकसभा निवडणूकीत उतरविण्याचा घाट पक्षश्रेष्ठीकडून घातला जात असल्याचे विश्वसनीय सूञाकडून समजते.

शिवसेना नेते तथा माजी मंञी चंद्रकांत खैरे हे या मतदारसंघाचे खासदार असून १९९९ पासून मागील सलग ४ लोकसभा निवडणूकीपासून ते निवडूण येत आहेत.त्यामुळे औरंगाबादचे खासदार म्हंटले की खैरे असे समीकरण बनले आहे. खासदारकीबरोबरच पश्चिम औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून ते १९९० व १९९५ च्या विधानसभा निवडणूकीत ते निवडून आले होते. १९९५ ला आलेल्या शिवसेना भाजपा युतीच्या सरकारमध्ये ते कँबिनेट मंञी होते. त्यामुळे साहजिकच शिवसेनेमध्ये खा.खैरे यांचा बोलबाला आहे. ‘मातोश्री’ दरबारी त्यांच्या शब्दाला किंमत आहे. २ वेळा आमदार,४ वेळा खासदार व माजी मंञी राहिल्याने शिवसेनेत ते एक बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे एक कडवे शिवसैनिक असलेल्या खा.खैरे यांच्या या मतदारसंघाची शिवसेनेचा अभेद्य गड अशी राज्यभर ओळख आहे.

शिवसेनेचा हा गड सर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणूकीत जोरदार रणनिती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने जागा अदलाबदलीत औरंगाबादच्या जागेची मागणी केली असून या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कमालीची आग्रही आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून विद्यमान खासदार खैरे यांना आव्हान देण्याचे मनसुबे आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खलबते व चर्चा चालू आहे. परवाच एका कार्यक्रमात ‘ येत्या लोकसभा निवडणूकीत खा.खैरे हरतील’ असे जाहीर वक्तव्य करुन आमदार चव्हाण यांनी खा.खैरे यांना डिवचून आपण लोकसभेची कुस्ती लढण्यास इच्छुक असल्याचे दाखवून दिले.

मागच्या औरंगाबाद दौ-यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमच्याकडे सतीश चव्हाणसारखा सक्षम उमेदवार असल्याचे सांगून त्यांनी आ. सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. औरंगाबाद जिल्ह्यात एक धडाडीचे नेतृत्व म्हणून आ.चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवार साहेबांचे एक अत्यंत निकटवर्तीय आमदार म्हणून ते राष्ट्रवादीच्या गोटात परिचित आहेत.औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात दबदबा ठेवून असलेल्या आ.चव्हाण यांचा अफाट जनसंपर्क असून त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. राजकारणात आवश्यक असलेल्या साम,दाम,दंड,भेद या नितीचा अवलंब करणारा धडाडीचा कुशल कार्यकर्ता असल्यामुळे खा.खैरे यांना आव्हान देण्याची आमदार चव्हाण यांच्यामध्ये क्षमता आहे. प्रचंड क्षमता,लोकांचा विश्वास यामुळे खा.खैरे यांना ते पर्याय ठरु शकतील, अशी धमक त्यांच्या अंगी असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जाते.

औरंगाबाद मतदारसंघात खा.शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील अनेक लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या कपाळी या मतदारसंघात गुलाल नाही. या पार्श्वभूमीवर खा.शरद पवार,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आ.सतिश चव्हाण यांच्यासाठी एक दिलाने काम करुन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे शक्ती उभी केल्यास आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचा अभेद्य गड म्हणून ओळखल्या जाणा-या या औरंगाबाद मतदारसंघात राजकीय भूकंप झाल्यास राजकीय जाणकारांनी काही आश्चर्य वाटून घेवू नये, हे माञ निश्चित !

You might also like
Comments
Loading...