fbpx

अपुरा आणि अर्धवट संकल्प, माजी अर्थमंत्र्यांची फडणवीस सरकारवर टीका

टीम महाराष्ट्र देशा: अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा अपुरा आणि अर्धवट आहे. कोणत्याही क्षेत्राच्या बाबतीत गंभीरपणे तरतूद केलेली दिसत नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आपल्यावर नाखूष अशा क्षेत्रांना खुश करू पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

सरकार म्हणून दैनंदिन कामकाज असणाऱ्या गोष्टींचाही अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख करून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे. ज्या गोष्टी गेली पाच वर्षे करणे अपेक्षित होत त्याची घोषणा आत्ता करून जनतेच्या मनात भरण्याचा हा डाव आहे, अशी टीका देखील पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, एका बाजूला अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडेअर्थमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंट काही क्षणांत ग्राफिक्स इमेज पोस्ट होत होत्या, त्यामुळे अर्थसंकल्प आधीच फुटल्याचा आरोप केला जात आहे. अर्थसंकल्प हा अत्यंत गोपनीय दस्तऐवज असतो मात्र या अर्थसंकल्प आधीच फुटलेला होता, अर्थमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंट वर अगदी काही क्षणांत ग्राफिक्स इमेज पोस्ट होत होत्या, एक ग्राफिक इमेज तयार करायला अर्ध्या तासांपर्यंत वेळ लागू शकतो मात्र इथे लगेच पोस्ट होत होत्या याचा अर्थ हे ग्राफिक्स आधीच तयार करून ठेवले होते. अर्थसंकल्प आधीच फोडून अर्थमंत्र्यांनी त्यांच्या गोपनीयतेच्या शपथेचा भंग तर केला आहेच, पण हा सभागृहाचा देखील अपमान आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांक यांच्या भल्यासाठी इथे काहीही नाही. केवळ रस्ते आणि पूल बांधण म्हणजे विकास कसा? , ते रस्ते आणि पूल वापरणाऱ्या माणसांच्या जीवनात काही बदल घडवणं महत्वाचं आहे. आमच्या काळात मांडलेले अंतरिम अर्थसंकल्प आणि आत्ताचा अंतरिम अर्थसंकल्प यांची तुलना केली तर युतीचा अर्थसंकल्प किती बोगस आहे हे लक्षात येईल. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.