यात्रा सुरु होण्याआधीचं ‘शिवस्वराज्य यात्रे’त गटबाजी, यात्रेपासून आव्हाडांना दूर ठेवण्याचा प्रयत्न

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रेचे’ आयोजन केले आहे. या यात्रेत खा. कोल्हे आपल्या पक्षाला बळ देणार असून राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या भूमिका समजावून सांगणार आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या बहुउद्देशीय या ‘शिवस्वराज्य यात्रेत’ गटबाजी असल्याचं समोर आले आहे. तर पक्षातील काही नेत्यांना विश्वासात व विचारात न घेता या यात्रेचे आयोजन केले असल्याची कुजबुज पक्षात सुरु आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावरून आज महाराजांचा आशीर्वाद घेऊन डॉ. अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. मात्र, या ‘शिवस्वराज्य यात्रे’तून पक्षाचे कट्टर पुरोगामी नेते जितेंद्र आव्हाड यांना लांब ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘पक्षाने माझा कधी वापरच केला नसल्याची’ खंत आव्हाड यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार आज आव्हाड यांना शिवस्वराज्य यात्रेत टाळलं जात असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप-सेनेने देखील यात्रा काढल्या आहेत. शिवसेनेने ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘महाजनादेश यात्रे’वर आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ही यात्रा असणार आहे.