अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीचा विजय

शिवसेनेला ४ तर राष्ट्रवादीला २ जागांवर विजय तर भाजपला खातेही उघडता आले नाही

ठाणे  : अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळविला आहे. ८ पैकी ६ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने जिंकल्या. यात शिवसेनेला ४ तर राष्ट्रवादीला २ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला खातेही उघडता न आल्याने भाजपला धक्का बसला आहे.

राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असूनदेखील यावेळी अंबरनाथ पंचायत समितीमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससह युती करत निवडणूक लढवली. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ जागा आहेत. त्यातील २ जागांवर शिवसेना तर १ जागेवर भाजपला विजय मिळाला. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाडी गटातून शिवसेनेच्या सुवर्णा राऊत विजयी झाल्या. तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामध्ये अंबरनाथ पंचायत समितीसाठी चोंण गणातून शिवसेनेच्या स्वप्नाली भोईर विजयी झाल्या आहेत. नेवाळी जमीन बचाव आंदोलनाचे अध्यक्ष चैनू जाधव यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आसनगाव गटात सेनेच्या मधुकर चंदे हे विजयी झाले.