काँग्रेसची स्वबळाची भाषा म्हणजे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न ?

nana patole vs uddhav

पुणे – काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. कॉंग्रेसची भूमिका ही एक पक्ष म्हणून योग्य असली तरीही महाविकास आघाडीचा एक प्रमुख भाग असलेल्या एका मोठ्या पक्षाने अशी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अडचण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून फटकारल्यानंतर देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. शिवसेनाही स्वबळावर लढू असं म्हणत असते. भाजपनेही स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, तरीही केवळ काँग्रेसलाच टार्गेट केलं जात आहे. मी सामना वाचत नाही, असं सांगतानाच आम्ही आमचा पक्ष वाढवत असू तर कुणाला का त्रास होतोय? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेला महत्त्व देत नसल्याचंही ते म्हणाले होते.

दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पटोले यांच्या सुरात सूर मिसळला. काँग्रेसच्या नंबर एक होण्याच्या महत्त्वाकांक्षेचं त्यांनी समर्थन केलं. ‘काँग्रेस राज्यात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. एक नंबरवर जाण्याची इच्छा ठेवली तर त्यात वावगं काय? आणि आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळतं असं सूत्र आहे,’ असं चव्हाण म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसची ही स्वबळाची भाषा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नच असल्याची भावना शिवसेनेमध्ये निर्माण झाली आहे.याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी स्वबळाची भाषा केल्यास लोक जोड्याने हाणतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पटोलेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.मुख्यमंत्र्यांच्या सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पटोले यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP