शिवेंद्रराजेंच ठरलं ! विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्याचे आमदार आणि राष्ट्रवादीचे मात्तबर नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे शिवेंद्र राजे पक्षांतर करणार असल्याचं जवळपास निश्चित झाल आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्र राजे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र अखेर शिवेंद्रराजे यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाला रामराम करून भाजपात प्रवेश करत आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील आता भाजपत जात आहेत. मतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्षांतर करत असल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी दिली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून दगा फटका होणार आहे, अशी भीती शिवेंद्रसिंहराजे यांना वाटत आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजपात जाणार असल्याचं बोललं जात होते. मात्र आता शिवेंद्रराजे यांचा निर्णय झाला आहे. ते आज कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. आणि उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.