‘तान्ह्या मुलानं आईजवळ जावं’ अशी माझ्या राजाच वैभव दाखवणाऱ्या प्रतापगडाची भेट

rohit pawar at panhalgad fort

शिवजयंतीची पुर्वसंध्या प्रतापगडच्या गौरवशाली इतिहासात घालवणं, शुरवीर छत्रपती शिवरायाचां इतिहास डोळ्यात साठवणं हा माझ्यासाठी आजपर्यन्तचा सर्वात स्फुर्तीदायी दिवस होता. प्रतापगड म्हणल्यानंतर आपल्या समोर उभा राहतो तो जावळीच्या जंगलात अविरत स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वराज्याच्या मावळ्याप्रमाणे उभा असणारा किल्ला.

Loading...

प्रतापगडाच्या पायथ्याला असणारी अफजलखानाची कबर. स्वराज्यावर आलेलं हे संकट महाराजांनी किती मोठ्या धाडसानं पेललं. गनिमी काव्याने अफजलखानाला जावळीच्या घनदाट अरण्यात बोलवून घेतलं. ज्या अफजलखानाच्या तावडीतून फक्त औंरंगजेबच निसटलेला, शहाजी महाराजांसोबत ज्याने गद्दारी केली होती, महाराजांच्या मोठ्या भावाशी ज्याने दगाफटका केला असा यमराज साक्षात पुढे असताना महाराजांनी त्यास शक्ती आणि युक्तीच्या बळावर चारिमुंड्या चित केलं. त्याच अफजलखानाची, ‘मृत्यू झाला की वैर संपतं’ या विचाराने महाराजांनी गडाच्या पायथ्याशी त्याची कबर बांधली. त्यास दिवाबत्तीची सोय केली. या शौर्यगाथेचा साक्षीदार म्हणजे हा भव्यदिव्य प्रतापगड.

असं म्हणलं जातं सह्याद्रीत फक्त वारा आणि मावळेच शिरू शकतात. किल्याच्या बुरजांवर उभा राहिलं की याचा प्रत्यय मला वारंवार येत होता. आजही या भागात फिरणं किती अवघड आहे हे जावळीचं खोरं पाहीलं की लक्षात येतं. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी या भागात महाराजांनी व स्वराज्याच्या मावळ्यांनी कशी झुंज दिली असेल असा प्रश्न वारंवार पडत होता.

किल्यांवरच्या पायऱ्या पाहिलं की लक्षात येत ते महाराजांची कशा प्रकारे बांधकामे करून घेतली. अवघ्या काही वर्षात बांधलेला हा प्रतापगड मात्र त्याच्या पायऱ्यांपासून ते बुरजांपर्यन्त सर्व काही गेली साडेतीनशे वर्ष तितक्याच भक्कमतेनं उभा आहे. आजच्या काळात उभा केलेल्या पायऱ्या एकाच वर्षात पुर्णपणे नष्ट होत असताना, त्यावेळीच्या तितक्याच भक्कम पायऱ्या पाहून त्या महाराजांच्या पाऊलांची आस ठेवून अजून त्याचं जिद्दीनं उभा आहेत अस वाटतं.

बुरूजांवर जावून सह्याद्रीची विशाल रांग पाहताना दूरवर दिसणारे किल्ले पाहिले की वाटतं शिवाजीराजांचा एक एक मावळा आजही स्वराज्याच्या रक्षणासाठी ताठ मानेनं उभा आहे. किल्यावर करण्यात आलेली पाण्याची सोय आजही आपली तहान भागवते, तिथं असणाऱ्या तोफा या महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. किल्यावर जाण्यास असणाऱ्या फसव्या वाटा या महाराजांच्या चाणाक्षपणाची ओळख करून देतात तर किल्यावर असणारी त्या काळातली शौचालयाची सोय पाहिलं कि महाराजांनी स्वच्छतेविषयी केलेली रचना पाहून मन थक्क होतं. छोट्या छोट्या गोष्टींचा देखील दुर्गरचनेत केलेला समावेशमुळेच शिवकालीन रचना आजही अनेक अभ्यासकांना भुरळ पाडत असतात.

या भेटीचं वर्णन लिहीत असताना मला एवढचं वाटतं कि हि खऱ्या अर्थाने एखाद्या तान्हा मुलानं आईजवळ जावं तशी भेट होती. प्रतापगडच काय शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रत्येक किल्ला शिवाजीराजे हे रयतेचे राजे होते हे सांगण्यासाठी पुरेसा बोलकां आहे. अशा या रयतेच्या राजाचे विचार प्रत्येकानेच आपल्या कृतीत आणण्याची गरज आहे. जाती, धर्म यापलिकडे राजांनी रयतेला आपलं मानून स्वराज्य निर्माण केलं. हेच विचार घेवून आपणं प्रत्येकानं जगायला हवं.

रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा !!!

लेखक – रोहित राजेंद्र पवार ( पुणे जिल्हा परिषद सदस्य )

 Loading…


Loading…

Loading...