fbpx

राफेल : राष्ट्रवादीने प्रतिकात्मक विमाने उडवून केला पंतप्रधान मोदी आणि अनिल अंबानींचा निषेध

ठाणे : राफेल विमान गैरव्यवहारप्रकरणी आज ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठामपा मुख्यालयासमोर खेळण्यातील तसेच कागदी विमाने उडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांचा निषेध केला. दरम्यान, “ हा व्यवहार म्हणजे सीमेवर लढणार्या जवानांच्या रक्ताचा केलेला सौदा आहे,” असा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

राफेल विमान खरेदीसाठीच्या व्यवहारामध्ये अनिल अंबानी यांना भागीदार करुन घेण्यासाठी भारत सरकारने दबाव टाकला होता, अशी कबुली फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांनी दिली आहे. त्यामुळेच मोदी सरकारने भाजपा सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवण्यासाठी सरकारी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिकल लि. (एचएएल) या व्यवहारातून बाहेर काढले असल्याचा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी “ देश का चौकीदार चोर आहे” , राफेल डील रद्द झाले पाहिजेच, अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला. तसेच, डोरेमॉन या कार्टूनला मोदींचे चित्र लावून तसेच कागदी विमाने उडवण्यात आली.

यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी  दर न वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यांना गांभीर्याने घेण्यात आले नाही. संरक्षण मंत्रालयाला विश्वासात घेण्यात आले नाही. 600 कोटींचे विमान आता 1600 कोटींमध्ये विकत घेतले जात आहे. हेच विमान आखाती देशांनी 600 कोटींमध्ये विकत घेतले आहे. मग, भारतानेच हे विमान एवढे महाग किमतीत का घेतले. त्याला मोदी यांनी सोन्याचा पत्रा लावलाा आहे का? तुम्ही स्वाक्षरी करुन हा व्यवहार करता; त्यामध्ये रिलायन्सला घुसवण्यात येते. फ्रान्सच्या कंपनीकडून तर एचएएलची तयारी करण्यात येत होती. पण, त्यांना धमकावण्यात आल की रिलायन्सला घेतले नाही तर हा व्यवहार रद्द करण्यात येईल. हा व्यवहार कोणाची खासगी मालत्ता नाही. हा व्यवहार देशाच्या सुरक्षेशी संबधीत आहे.

आज जो आमचा बांधव सीमवर रक्ताची होळी खेळत आहे. आपल्या जीवाचा त्याग करीत आहे. त्यांच्या रक्ताचा सौदा करण्यात येत आहे. अंबानींशी असलेल्या मैत्रीसाठी देशाच्या सुरक्षेशी चाललेला खेळ आम्ही चालू देणार नाही. बोफोर्स घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्यात आली होती. त्याच धर्तीवर राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी; राफेल विमानांचे वाढवलेले दर आणि कमी केलेली संख्या, या व्यवहारातील करारपत्राची संपूर्ण सत्यता, एचएएलला बाजूला सारुन रिलायन्सला कंत्राट देण्यासाठी करण्यात आलेला आग्रह; याबाबत सदर करारावर स्वाक्षरी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही आ. आव्हाड यांनी केली.