राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा एमआयएमला पाडलं खिंडार; ‘या’ शहरातील नेत्यांनी केला प्रवेश

ajit pawar vs asaduddin owaisi

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरात इनकमिंग सुरु आहे. २०१४ नंतर भाजपमध्ये झालेली मेगाभरती थांबली आहे. तर, भाजपमधून गळती सुरु झाल्याचं दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

तर, एआएमआयएमसह इतर पक्षातील स्थानिक नेते देखील राष्ट्रवादीने स्वतःच्या गळाला लावल्याचे दिसून आले होते. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा एआएमआयएमला खिंडार पाडलं आहे. पुणे शहरातील एमआयएम पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार चेतन तुपे यांच्या पुढाकाराने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे.

एमआयएमचे पुणे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख, मोसिन खान, तन्वीर शेख, इम्रान बागवान, जावेद मोमिन, साद शेख, सोहेल बागवान व पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीची वाट धरली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात सोलापूरमधील एआएमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले होते. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री नवाब मलिक यांची भेट देखील घेतली होती. त्यांच्यासह एआएमआयएमचे सोलापूरमधील दहाच्या दहा नगरसेवक देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या