प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेबाबत शशिकांत शिंदेंनी सोडले मौन, म्हणाले….

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही आता बदल होणे अपेक्षित आहे. जयंत पाटील मंत्री झाल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक व अत्यंत महत्वाची जबाबदारी कोणाकडे वर्ग होईल असा प्रश्न उपस्थित केला जात होता, त्यावर आता उत्तर निश्चित झाले असल्याचे समजते.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातील माजी मंत्री व शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान समजले जाणारे शशिकांत शिंदे यांची आता प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती होणार अशी चर्चा आहे. शशिकांत शिंदे हे पक्ष स्थापनेपासून चे सदस्य असून पवारांचे अत्यंत निष्ठावान व निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांचा शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्याकडून अवघ्या सहा हजार मतांनी पराभव झाला होता. तत्पूर्वी सलग दोन टर्म त्यांनी कोरेगाव चे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर 2009 ते 14 च्या आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून कामही केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये पक्ष संघटन मजबूत ठेवण्यामध्ये शिंदेंचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश्याध्यक्ष पदाबाबत अद्याप कोणताही निर्णय पक्षाने जाहीर केलेला नाही. तसेच पक्ष आणि पक्ष्याध्यक्ष यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात पक्ष जो निर्णय घेईल, जी जबाबदारी देईल ती पार पडण्यास माझी तयारी आहे, अशी प्रतिक्रिया कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी बोलताना दिली.