कधीकाळी शरद पवारांनीच मंत्री करण्यास दिला नकार, आज केले प्रदेशाध्यक्ष!

‘साहेबांना कोणाला कधी काय करायचं हे कळत’ जयंत पाटील यांनाच आली होती या वाक्याची अनुभूती...

महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकतवर पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा आता जयंत पाटील यांच्या हाती असणार आहे. अभ्यासू आणि सर्वसमावेशक चेहरा असणाऱ्या जयंत पाटील यांच्यासमोर पक्षाला नवी उभारी देण्याचे आव्हान आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांनी ‘नेत्यां मागे फिरणाऱ्या नाही तर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार’ असल्याच सांगितल. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षीय फेरबदल झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

जयंत पाटील यांची निवड करण्यात आल्यानंतर बोलताना त्यांनी एका बाजूला शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, तर दुसरीकडे ‘साहेबांना कोणाला कधी काय करायचं हे कळत’ म्हणत आपल्याच पक्षातील नेत्यांना कोपरखळ्या घातल्या, कधीकाळी पाटील यांना याच वाक्याची अनुभूती  स्वत:ला आली होती.

झाल अस कि, अमेरिकेत शिकत असणाऱ्या  जयंत पाटील यांना वडील स्व. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर सक्रीय राजकारणात प्रवेश करावा लागला, १९८४ ते ९० पर्यंत सहकारी साखर कारखाना, स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करत त्यांनी राजकाणात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. १९९० मध्ये प्रथम वाळवा – इस्लामपूर मतदारसंघातून ते कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यावेळी  जयंत पाटील यांचे काही उत्साही सहकारी त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी करत शरद पवार यांच्याकडे गेले, मात्र ‘ते सध्या राजकारणात नवखे आहेत’ म्हणत पवार यांनी त्यांना मंत्री करण्यास नकार दिला. आणि आज त्याच शरद पवार यांनी जयंत पाटलांवर आपल्या पक्षाची धुरा सोपवली आहे.

१९९० ते  २०१८ या ३० वर्षाच्या काळात बरच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यानंतर शरद पवार यांनी जयंत पाटील यांना आग्रहाने पक्षात बोलावून घेतले. 1999 मध्ये कॉंग्रेस –राष्ट्रावादी आघाडी सत्तेवर आल्यावर शरद पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला, आणि म्हणाले कि, ‘उद्या तुम्हाला मंत्री पदासाठी शपथ घेयची असून अर्थमंत्रालय पहायचं आहे’, यावर पाटील यांनी ‘म्हातारी माणस,  ६० – ६५ वय झालेले नेते हे खात पाहतात तुम्ही मला का सांगताय’ असे विचारले. यावर शरद पवारांनी एकच उत्तर दिले, ते होते, ‘तू शहाणा आहेस, सकाळी ये तुला सांगतो’.

पुढे  १९९९ ते २००८ पर्यंत जयंत पाटील यांनी अर्थमंत्री पदाची धुरा सक्षमपणे सांभाळली. आपल्या ग्रामविकास मंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला सलग तीन वर्षे देशात पहिल्या क्रमांकावर ठेवले. गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना पोलीस दलात हायटेक टेक्नोलॉजीने सुसज्ज शस्त्रास्त्र आणली. जी जबाबदारी मिळेल ती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. म्हणूनच राजकारणातील चाणक्य समजले जाणाऱ्या शरद पवार यांनी प्रतिकूल काळात पक्षाची जबाबदारी जयंत पाटील यांच्या खांद्यावर दिली असेल.