‘मला तोंड उघडायला लावू नका, नाही तर…’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना पक्षामध्ये जाण्यासाठी विरोधकांची रांग लागलेली दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच इंदापूरचे माजी आमदार आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील हाती कमळ घेतले आहे. या मातब्बर नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी चांगलाच धक्का बसला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर चांगलाच शाब्दिक निशाणा साधला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात सणसवाडी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, ‘खोटं बोलून टीका करू नका. मला तोंड उघडायला लावू नका नाहीतर तुमच्या अडचणी वाढतील’, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेमध्ये हर्षवर्धन पाटलांना खडेबोल सुनावले.

तसेच पुढे बोलताना म्हणाल्या की, सुप्रिया सुळे, राहुल गांधी आणि हर्षवर्धन पाटील यांची दिल्लीत बैठक झाली असे सांगत पाटलांनी राष्ट्रवादीवर टीका केली. पण आमच्या तिघांची बैठक कधीच झाली नाही, असा गौप्यस्फोट खा. सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे बोलताना केला. तसेच यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी अगदी प्रामाणिकपणे काम केल्याची कबुली दिली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री भास्कर जाधव व एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी देखील मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधले. तसेच राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच जोर धरताना दिसत आहे.