राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले

टीम महाराष्ट्र देशा – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या पराभूत उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुमेध भवार असं मारहाण करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. याबाबतचे वृत्त NEWS18 लोकमत ने दिले आहे.

शनिवारी अंबरनाथ येथील कल्पना हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादीच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्ष सचिन अहिरेकर यांना मनसे नेता सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. यावेळी अहिरेकर यांच्या डोक्यात दगड मारल्याची माहिती आहे. यात अहिरेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी सुमेध भवार यांनी सचिन अहिरेकरवर यांच्यावरच आरोप केला असून सचिनने आपल्याला फोन करून शिवीगाळ केली. त्याचबरोबर त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. तसेच तो दारू पिऊन आला होता. माझ्यासोबत वाद घालत असताना तो स्वतःच पडला आणि डोक्याला जखम झाली, असं मनसेच्या सुमेध भवार यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणी सचिन अहिरेकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भवार आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अंबरनाथ राष्ट्रवादीचे पदाधिकारी या प्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे.