राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पुत्रांचं साडे तेरा कोटींचं कर्ज! शेतकऱ्यांच्या नावावर

babanraw shinde

पंढरपूर: माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन मुलांसह दोघांनी साडे तेरा कोटी रुपयाचं कर्ज तर घेतले. मात्र त्याचा बोजा स्वताच्या सातबाऱ्यावर चढवण्याऐवजी अधिकाऱ्यांनी दोन शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर चढवल्याचा प्रकार घडला आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात बँक घोटाळे ताजे असतांनाच दुसरीकडे प्रशासन व अधिकारी अजूनही गंभीर नाहीत.

आमदार पुत्रांसह दोघांनी साडे तेरा कोटी रुपयाचं वैयक्तिक कर्ज घेतलं. मात्र प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे हि रक्कम अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर चढवली. ही रक्कमही थोडी थिडकी नव्हती, तर तब्बल साडे तेरा कोटींची होती. एवढी मोठी कर्जाची रक्कम ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

याबाबत तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयातून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. पुरते हादरलेल्या या दोन शेतकरी कुटुंबाने अखेर माध्यमांशी संपर्क साधल्यावर अधिकाऱ्यांनी आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली. मात्र या प्रकरणात अधिकाऱ्यांनी आमदार पुत्रांवर मेहरबानी दाखवली का ? किंवा अधिकारी आणि आमदार पुत्रांमध्ये काही मिलीभगत होती का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

दरम्यान, आमदार पुत्र रणजित शिंदे म्हणाले, आमच्या नावचं कर्ज दुसऱ्याच्या नावावर चढवल्याची माहिती नुकतीच मिळाली, आपला याच्याशी काहीही संबंध नाही

काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन मुलांसह आणखी दोघांनी टेंभूर्णी येथील कोटक महिंद्रा बँकेकडून साडे तेरा कोटी रुपयाचं कर्ज घेतले होते. यामध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित आणि विक्रम शिंदे यांच्यासह अनिल वीर आणि संतोष मराठे यांचा सहभाग होता. शासनाने आमदार पुत्रांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढण्याच्या ऐवजी माढ्यातील शालनाबाई घोलप आणि विजय मासाळ या दोन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर हा साडे तेरा कोटी रुपयाचा बोजा चढवला. शेतकरी घोलप यांचे पुत्र शरद हे आपल्या घराच्या बांधकामासाठी गृहकर्ज मागायला गेल्यावर त्यांना या साडे तेरा कोटींच्या उताऱ्यावरील बोजामुळे कर्ज नाकारण्यात आले. तेव्हा हा सदर प्रकार समोर आला.