जयदत्त क्षीरसागर थेट मोदींच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

नवी दिल्ली : राष्ट्रवादी नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या मोदी भेटीमुळे राष्ट्रवादीच्या चिंतेत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीपासून दुरावलेले बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील काही दिवसांपूर्वी झाली होती . मात्र आपण कायमचं राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचं सांगून त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र आता पुन्हा एकदा मोदी क्षीरसागर यांच्या भेटीने राजकीय क्षेत्रात तर्क – वितर्कांना उधाण आले आहे.

क्षीरसागर यांनी दिल्लीत होणाऱ्या तेली समाजाच्या भव्यदिव्य एकता संमेलनास उपस्थित राहाण्याचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली ही भेट निमंत्रणाची असली तरी गेल्या काही महिन्यापासून जयदत्त क्षीरसागर भाजपशी जुगाड साधत असल्याच्या प्रयत्नाने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.

दिल्लीमध्ये तेली समाजाचे ऐतिहासिक अधिवेशन होणार असून, या अधिवेशनाचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे अध्यक्ष आहेत. अधिवेशनासाठी तीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातील समाज बांधव दिल्लीत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण दिले आहे आणि हे निमंत्रण त्यांनी स्विकारल्याचीही माहिती समोर आलीये.

चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी क्षीरसागर यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.