fbpx

मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांने रोखले महाडीकांचे भाषण , अजित पवारांसामोरच भर सभेत तुफान राडा

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि याचं जागेवरून इच्छुक असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र , अंतर्गत असणारा हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

या कार्यक्रमाला अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित आहेत. मात्र या कार्यक्रमादरम्यान खासदार धनंजय महाडिक हे भाषणाला उभे राहिले असताना, त्यांच्या भाषणाला विरोध करण्यात आला.

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील कार्यकर्त्यांनी खासदार महाडिकांच्या भाषणाला विरोध केला. त्यामुळे भाषण सोडून महाडिक यांना बाजूला बसण्याची वेळ आली. मग आमदार मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना दम दिला. आपण मुन्ना महाडिकांनाच शंभर टक्के मतं देऊन निवडून आणायचं आहे, असं मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना बजावलं. त्यानंतर मुश्रीफांनी धनंजय उर्फ मुन्ना महाडिकांना भाषण देण्याची विनंती केली. मात्र महाडिक पुन्हा भाषण करण्यास राजी होत नव्हते. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या नेत्याने महाडिकांच्या हाताला धरुन ओढून भाषणासाठी आणलं.

अजित पवार, जयंत पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसमधील यादवी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.