हल्लाबोलच्या माध्यमातून आमदार दिलीप सोपलांच्या नातवाचे राजकीय ‘लॉचिंग’

पारंपारिक राजकारणाला 'आर्यन'' फाटा देणार का ?

बार्शी तालुक्यातील राजकारणावर गेली तीन दशके एकहाती पकड ठेवणारे आमदार दिलीप सोपल यांनी आता आपल्या नातवाला म्हणजे आर्यन सोपल यांना प्रमोट करायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात काढण्यात आलेला हल्लाबोल मोर्चा आज बार्शी तालुक्यामध्ये धडकला. यावेळी वैराग येथे घेण्यात आलेल्या सभेला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. यामध्ये प्रामुख्याने आर्यन सोपल याने काढलेल्या दुचाकी रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे येत्या काळात आपल्या आजोबांच्या सोबतीने आर्यन देखील तालुक्याच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याच दिसत आहे.

निष्क्रिय सरकारवर हल्लाबोल म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यभरात हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल आहे. सध्या पक्षाचा गड मानला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभेच आयोजन करण्यात आल आहे. याच दरम्यान शनिवारी बार्शी तालुक्यातील वैराग येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी करत सरकारवर हल्लाबोल केला. तर सोपल यांच्या आधी आर्यन सोपल यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील विरोधकांना टार्गेट केल्याचं पहायला मिळाल.

हल्लाबोल आंदोलनाच्या पूर्वनियोजनात देखील आर्यनचा सक्रीय सहभाग दिसून आला. तसेच युवक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल दिसणारी क्रेज बघता येत्या काळात आर्यन तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. मात्र त्याच्या पुढील आव्हाने देखील मोठी असणार आहेत. आजोबांनी तयार केलेला लोकसंग्रह सांभाळणे हे आर्यनच्या पुढील मोठे आव्हान असणार आहे. तर नजीकच्या काळात बदलत असलेल्या पारंपारिक राजकारणाला फाटा देत नव्या तंत्राचे राजकारण त्यांना करावे लागणार आहे.

नजीकच्या काळात तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याच पहायला मिळाल होत. मात्र, हल्लाबोलच्या निमित्ताने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. हेच टायमिंग साधत आपल्या नातवाला राजकाणात लॉच करण्याची योग्यवेळ आमदार दिलीप सोपल यांनी साधली आहे. आता त्यांच्याप्रमाणे तालुक्यातील जनता आर्यनला देखील स्वीकारणार का हे पाहन महत्वाच ठरणार आहे.