fbpx

30 वर्ष पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा उद्या शिवसेनेत प्रवेश ?

टीम महाराष्ट्र देशा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार गळती लागल्याचे दिसत आहे. तर पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बोटावर मोजण्या एवढेच नेते राहतील की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता गेली 30 वर्षे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले आणि त्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आमदार दिलीप सोपल हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे. सोपल यांच्या प्रवेशाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व दिले जाणाऱ्या बार्शी विधानसभा मतदारसंघातुन दिलीप सोपल हे सहा वेळा विजयी झाले आहेत. आजवर राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणारे सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे. मागील महिन्यापासून सोपल यांच्या समर्थकांकडून शिवसेना प्रवेशाचे मेसेज सोशल मीडियावर पसरवले जात होते, मात्र खुद्द दिलीप सोपल यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नव्हता. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेणार असल्याचं ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले होते.

आ. दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश सध्या भाजपमध्ये असणारे माजी आ. राजेंद्र राऊत यांच्यासाठी देखील अडचणींचा ठरणार आहे. युतीच्या जागावाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, यामध्ये राऊत यांनी दोनवेळा शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला असल्याने पक्षप्रमुख त्यांच्यावर नाराज आहेत. सोपल यांच्या प्रवेशामुळे राऊत यांचा वचपा काढण्याची आयती संधी शिवसेनेला मिळणार आहे.

आमदार दिलीप सोपल यांची राजकीय कारकीर्द

1985 साली शरद पवार यांच्या तत्कालीन समाजवादी काँग्रेसपक्षातून आमदार

1990 काँग्रेस, 1995 अपक्ष, 1999 राष्ट्रवादी काँग्रेस, 2009 अपक्ष, 2014 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी.

सलग सहावेळा वेगवेगळ्या चिन्हावर आमदार

1995 साली युती सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये पाणी पुरवठा आणि सोलापूरचे पालकमंत्री पद

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष

५२ नगरसेवक घेऊन शरद पवारांचा ‘हा’ जवळचा नेता चालला भाजपात

ज्या पक्षात जनतेच्या विकासाचे हित असेल तिथे मी जाणार – शिवेंद्रराजे भोसले

उशिरा का होईना राज्य सरकारला जाग आली ! जल आपत्तीवरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला