मोठी बातमी: माढा लोकसभेचा तिढा सुटणार, पुण्यातील बारामती हॉस्टेलवर खलबतं सुरु

ncp meeting for madha loksabha

पुण: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समाजला जाणाऱ्या माढा लोकसभेसाठी पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याचे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत. माढ्याची उमेदवारी विद्यमान खा विजयसिंह मोहिते पाटील यांना कि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना देयची यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

पुण्यात सुरु असलेल्या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार याच्यासह खा, विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित आहेत. माढा लोकसभेसह आघाडीमध्ये पक्षाकडे असणाऱ्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर देखील या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. तर दुसरीकडे माढा लोकसभेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नव्हता. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यापैकी कोणाला तिकीट मिळणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.

काही दिवसांपूर्वी माढा लोकसभेच्या इच्छुकांना शरद पवारांकडून ‘वेट एंड वॉच’ आदेश आल्याचं बोलल गेल. मतदारसंघात  झालेल्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने माढा लोकसभेचा उमेदवार फायनल होणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे माढा लोकसभेला मोहिते-पाटील की देशमुख असा प्रश्न कायम राहिला.

माढा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार कोण याबाबत मतदार संघात सध्या जोरात चर्चा चालू आहे. लोकसभेच्या २०१४साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते.