मोदींच्या बोचऱ्या टीकेला, राष्ट्रवादीचा  प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न 

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे प्रचार सभा घेतली. यावेळी मोदींनी विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली असून शरद पवार यांना विशेष लक्ष करण्यात आले होते. कुशल राजकारणी शरद पवार यांनी देशातील वारे पाहून निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला आहे.अशी बोचरी टीका मोदींनी यावेळी केली. त्यामुळे आता मोदींच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात शरद पवारांवर टीका केल्याशीवाय प्रसिद्धी मिळत नाही हे मोदींना माहित आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय. असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तर सुळे पुढे म्हणाल्या की,मोदींनी आपल्या पक्षाची चिंता करावी, राष्ट्रवादीची चिंता करायला आम्ही समर्थ आहोत.

तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील मोदींच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. वर्धा इथे झालेल्या सभेत गर्दी कमी झाल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. २०१४साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांना कळले अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंडे पुढे म्हणाले की, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे.शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे अशी आठवणही मुंडे यांनी करून दिली.

दरम्यान शरद पवार हे हवा कोणत्या बाजूला वाहते हे ओळखतात, त्यामुळेच त्यांनी मतदानापूर्वीच निवडणुकीतून माघार घेऊन मैदानातून पळ काढला आहे. तसेच सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गृहकलह सुरु असून अजित पवार यांनी शरद पवारांना हिट विकेट केलं आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला होता.