‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यांची भूमिपूजन आणि उद्घाटन थांबवावे, आम्ही राम मंदिराचे भूमिपूजन थांबवू’: सुजय विखेंचा अजब तर्क

अहमदनगर: अनेक दशकांच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम आता सुरु होत असून ५ ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हि तारीख घोषित केल्यानंतर अनेक टीका टिप्पणी करण्यात आल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भूमीपूजनावरून मोदींवर निशाणा साधला होता.

यावर आता, “राष्ट्रवादीचे कित्येक आमदार आणि मंत्री दररोज वेगवेगळ्या रस्त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन थांबवावी मग आम्ही देखील थांबू,” असा टोला लगावत अहमदनगरचे भाजपा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

तसेच, “राम मंदिर आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे”, असे पत्युत्तर देखील विखेंनी दिले. तर, ‘राम मंदिराचे भूमिपूजन हा इतर सण-उत्सवांसारखा दरवर्षी येणारा उत्सव नाही. त्यामुळे राम मंदिराला धर्माशी जोडण्याचे कारण नाही,’ असा सल्ला सुजय विखे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना दिला आहे.

दरम्यान, भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं होत.