नगर पॅटर्नमुळे राष्ट्रवादी नेत्यांना वाटू लागली लाज

Jitendra-Awhad

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगरमध्ये भाजप – राष्ट्रवादीने एकत्र येत स्थापन केलेल्या युतीची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशभरात भाजप विरोधात आघाडीची मोट बांधण्यासाठी काम करत आहेत. मात्र, नगरमधील स्थानिक नेत्यांनी पक्षालाच कोलदांडा दिल्याने वरिष्ठ नेते देखील नाराजी व्यक्त करत आहेत. परखड मत मांडण्यासाठी ओळखले जाणारे आ.जितेंद्र आव्हाड यांनी नगरच्या प्रकाराची लाज वाट असून आपण माफी मागत असल्याचं ट्वीट केल आहे.

पत्रकार विजय चोरमारे यांच्या ट्वीटला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड भूमिका मांडली असून लाज वाटते माफ करा.. असा रिप्लाय दिला आहे. अहमदनगर महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप – राष्ट्रवादीने युती केल्याने शिवसेनेला सत्तेपासून दूर रहाव लागणार आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपने राष्ट्रवादीच्या टेकूने आपला महापौर निवडून आणला. दरम्यान, एका बाजूला भाजपला विरोध करायचा आणि दुसरीकडे सत्तेसाठी हात मिळवणी करायची खेळी राष्ट्रवादीकडून खेळण्यात आल्याने सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

भाजपला साथ देणाऱ्या नगरसेवकांना नोटीस

अहमदनगरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने महानगरपालिकेची निवडणूक लढले होते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय अत्यंत आक्षेपार्ह व अस्वीकारार्ह असल्याचं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. सर्व संबंधित नगरसेवकांना याबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश मी दिले आहेत. या नोटीसांना उत्तर आल्यानंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी म्हंटले आहे.