fbpx

उदयनराजेंच्या वाढदिवसाला शरद पवार जाणार; मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचा बहिष्कारच

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या शाही वाढदिवसा निमित्त साताऱ्यामध्ये जोरदार तयारी केली आहे. मात्र, उदयनराजेंच्या वाढदिवसाला जायचं की नाही याचच पेच राष्ट्रवादी कॉंग्रेस समोर पडला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांसोबत गुप्त बैठक घेतली. या बैठकीत कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला. पण, पक्षाध्यक्ष शरद पवार मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला काही काळ स्वतः खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वाढदिवस कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उदयनराजे आणि पक्षाध्यक्ष शरद पवार बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक सुरू होती. त्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या बैठकीला विधान परिषद सभापती रामराजे नाईक, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे , मकरंद पाटील, नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. खासदार उदयनराजे भोसले छत्रपती यांच्या वाढदिवसाची आज, साताऱ्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्यातील बडी नेते मंडळी साताऱ्यात दाखल झाली आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.