राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु; धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत ?

dhananjay munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. आता हे वृत्तसमोर येताच राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. तर, कालच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील हे उपस्थित होते. यासंदर्भात एबीपी माझाने माहिती दिली आहे.

दरम्यान, मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, महाविकास आघाडीचे गेंड्याच्या कातडीचे सरकार राजीनामा घेईल का ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

‘सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल राजीनामा द्यायला हवा. त्यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही.ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात त्या व्यक्तीला या पदांवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून त्यांचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे’, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या