दानवेंच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची ‘स्वारी’

ravsaheb danve and rohit pawar

टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ असणाऱ्या भोकरदनमध्ये शेतकरी मेळावा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेते रोहित पवार यांनी थेट दानवेंच्या बालेकिल्ल्यात स्वारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला मदत करणाऱ्यांचा ऊस आकसापोटी दानवेंच्या कारखान्याकडून घेतला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा ऊस आता बारामती अॅग्रो घेणार असल्याचे सांगत पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

भोकरदन तालुक्यातील सिपोरा-बाजार येथे रावसाहेब दानवे यांचा रामेश्‍वर सहकारी साखर कारखाना आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस याच कारखान्याला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जाफ्राबाद तालुक्‍यातील काही गावांनी राष्ट्रवादीला मदत केली होती, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा ऊस दानवेंच्या कारखान्याकडून घेतला जात नसल्याची तक्रार केली जात आहे. हि बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना सांगितली होती.

कार्यकर्त्यांनी मांडलेल्या प्रश्नावर लक्ष घालण्याची सूचना अजित पवार यांनी रोहित यांना केली होती. त्यामुळे रोहित पवार यांनी थेट जाफ्राबाद येथे युवक व शेतकरी मेळावा घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच भोकरदनला लागून असलेल्या कन्नड येथील बारामती अँग्रोच्या कारखान्याकडून येथील शेतकऱ्यांचा ऊसाचे गाळप करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्षांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते, त्यानंतर शेतकरी पुत्रांनी थेट त्यांच्या घरासमोर बसुनच उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आज भाजप प्रदेशाध्यक्षांसह सत्ताधारी शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर गंभीर दिसत नसल्याची टीका रोहित पवार यांनी यावेळी केली, तसेच शेतकऱ्यांच्या शेतात ऊसाचे एक टिपूर देखील शिल्लक राहणार नाही काळजी घेण्याचा शब्द दिला आहे.