‘ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?’ रोहिणी खडसेंचा थेट सवाल

devendra fadnvis - rohini khadase

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. यातच आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात 19 जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते घेत असताना आता निवडणुका लागल्याने हा मुद्दा पेटणार असल्याचे चिन्ह आहे. भाजपमधील ओबीसी नेत्यांनी देखील या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यसरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठीच 26 जूनला राज्यभर भाजपचे चक्काजाम आंदोलन आहे.

त्यातच आता भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या पोटनिवडणुकांत सगळ्या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच संधी देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता ? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं टोला रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पावलोपावली त्रास दिला, क्षणाक्षणाला छळलं, प्रसंगी पक्षातून बाहेर जाण्यासंबंधीचं पाऊल उचलावं लागलं, अशी थेट टीका स्वत: एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना केली होती. ओबीसी नेतृत्व डळमळीत करण्याचं कामही फडणवीसांनी अनेकदा केल्याचं खडसेंनी म्हटलं. याचाच संदर्भ घेत रोहिणी खडसे  यांनी भाजप आणि फडणवीस यांना लक्ष केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP