‘या मातीशी बेईमानी करणाऱ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही, हा महाराष्ट्र द्रोह लक्षात राहील’

rajesh vitekar

मुंबई : कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू, आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आणि सामान्य माणूस हतबल. अशा स्थितीतही निष्क्रीय असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अडीच लाख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘माझे अंगण, रणांगण’, अशी घोषणा देत ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे हे आंदोलन केले.

मात्र या आंदोलनावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे. महापुराच्या संकटावेळी तुमचा कारभार सर्वांनी पाहिलाय. आज कोरोनाच्या संकटात मदत करण्याऐवजी महाराष्ट्राशी गद्दारी करत आहेत. हा महाराष्ट्र द्रोह लक्षात राहील, या मातीशी बेईमानी करणाऱ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही! अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी केली आहे. राजेश विटेकर हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार होते.

तर दुसरीकडे भाजपच्या या आंदोलनावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. आज एका मोठ्या पक्षाच्या युनिटने खलाच्या पातळीचे राजकारण करून मोठा जागतिक विक्रम केला आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण जग राजकारण, व्यक्तिगत वाद आणि हेवेदावे विसरून एकमेकांना मदत करत आहे. मात्र हा एक असा पक्ष आहे ज्याने राजकारण करत समाजात भीती, द्वेष, आणि दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पक्ष राजकारणासाठी राज्या वर आलेली महामारी विसरला आहे, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे.

दरम्यान, राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने धडाडीने पावले टाकून प्रभावी उपाययोजना करावी तसेच रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार आणि शेतकरी यांच्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करावे या दोन प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्याची मागणी भाजपने दिली आहे. कोरोनाच्या संदर्भात सर्व नियमांचे पालन आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग हे आंदोलनाचे वैशिष्ट्य होते. अस देखील भाजपने म्हंटले आहे.