fbpx

भर सभेत पंकजांची स्तुती केल्याने पुन्हा एकदा राजेश टोपेंच्या पक्षांतराच्या चर्चांना पेव

मोहन नजान :- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. अनेक दिग्गज नेते आणि अगदी काही दिवसांपूर्वीच ज्यांना शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय समजले जायचे अशा अनेक नेत्यांनी पवारांची साथ सोडली आहे. आता काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या संपर्कात असणारे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार राजेश टोपे यांची भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली आहे. त्याच कारण देखील तसच आहे. अंबड येथील एका कार्यक्रमात राजेश टोपे यांनी चक्क भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

मी आजपर्यंत जे काम त्यांच्याकडे घेऊन गेलो ते कधीच अडले नाही. पंकजा या माझ्या भगिनी असल्याचा उल्लेखही राजेश टोपे यांनी केला.विरोधी पक्षात असलेले टोपे हे सत्ताधारी पक्षात मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंचे गुणगान गात असल्याचे पाहून काही वेळेसाठी उपस्थित गावकरी सुद्धा आश्‍चर्यचकित झाले होते. विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसताना दिसत आहेत . सार्वजनिक कार्यक्रमात विरोधीपक्षात असलेल्या टोपेनी सत्ताधारी मंत्र्यांचे कामाचे गोडवे गायले. यामूळे राजकीय चर्चेला मात्र उधाण आले आहे.

राजेश टोपे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आता टोपे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा राजेश टोपे यांचा मतदारसंघ आहे. घनसांवगी विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना २४  हजार मतांचे लीड मिळाल्यामुळे राजेश टोपे यांची चांगलीच गोची झाली आहे. तीन वेळा आमदार असलेल्या राजेश टोपे यांना आगामी विधानसभा निवडणूक कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे ते लवकरच पक्षांतर करू शकतात.

या आधी ही राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक,सचिन आहिर, चित्रा वाघ, रश्मी बागल, असे अनेक नेते शिवसेना भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालेले आहे. राजेश टोपे यांनी ही जर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर हा पक्षासाठी मराठवाड्यामध्ये मोठा धक्का असेल.