fbpx

विखे-पाटील कुटुंब सत्तेशिवाय राहू शकत नाही, जिथे सत्ता तिथं ते – नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असा आरोप मलिक यांनी केला आहे. माध्यमांशी ते बोलत होते. विरोधीपक्ष नेते व काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या अगोदरच त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला.

विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे तर भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. विखे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे. ‘ याचदरम्यान, नवाब मलिक यांना त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता, सन १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांना मिळालं आणि आता भाजपाची सत्ता आल्यावर ते त्यांच्याकडे वळले आहेत. विखे पाटीलांचा मुलगा ज्यावेळी भाजपामध्ये गेला त्याचवेळीच राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते. पब्लिसिटीसाठी टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करीत आहेत असे मलिक यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर, विरोधी पक्षनेतेपद गेले हे सांगण्यासाठी आज त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. तसेच जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.