अंधेरीतील रेल्वे पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेची पुन्हा एकदा पोलखोल – नवाब मलिक

navab malik

मुंबई : अंधेरीत आज गोखले रेल्वे पुलाची घडलेली दुर्घटना म्हणजे पुन्हा एकदा रेल्वेची पोलखोल करणारी ठरली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

एलफिन्स्टन रेल्वे पूल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेच्या पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याची घोषणा केली होती परंतु रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या किती पुलांचे ऑडिट केले. किती नवीन पुलांची बांधणी केली आणि किती पुलांची दुरुस्ती केली याचे आकडे आजपर्यंत समोर आलेले नाहीत असेही नवाब मलिक म्हणाले.

रेल्वेमंत्री मुंबईमध्ये कार्यक्रमाला येतात त्यावेळी अशा दुर्घटना होतात. त्यामुळे मंत्रीमहोदय प्रसिध्दीचे कार्यक्रम घेण्यापेक्षा रिव्हयू घ्या असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.

रेल्वेच्या समस्या मुंबईवासियांच्या किंवा देशातील लोकांच्या जीवाला धोका बनत चालला आहे आणि दुसरीकडे मंत्रीमहोदय फक्त प्रसिध्दीसाठी कार्यक्रम घेत आहेत. मुंबईवासिय, देशवासिय कार्यक्रम नाही तर उपाययोजना मागत आहेत. रेल्वे मंत्रालयाने काय उपाययोजना केली आहे. पुढच्या काळात अशाप्रकारची दुर्घटना होवू नये यासाठी काय करत आहात याचा जबाब दया असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

एलफिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला क्लिनचिट दिली आहे आणि आतासुध्दा तेच केले जाणार आहे. त्यांच्यावर जबाबदारी कायम होत नाही आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अशाप्रकारची दुर्घटना थांबणार नाही. त्यामुळे आत्ताच वेळ आहे जागे व्हा असा इशाराही नवाब मलिक यांनी सरकारला दिला.