एकानं डॉक्टर बनायचं तर दूसऱ्यानं पेशंट, हा सेना-भाजपचा नेहमीचाचं खेळ – आव्हाडांचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना – भाजपवर निशाणा साधला आहे. आमचं ठरलंय, बिघडलंय हा शिवसेना आणि भाजपचा नेहमीचा खेळ आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईत माध्यमांशी आव्हाड बोलत होते.

लोकसभा निवडणुकी आधी शिवसेना- भाजप एकमेकांवर आक्रमक झाले होते. लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याच्या घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केल्या होत्या. मात्र त्यांच्यात मनोमिलन होत लोकसभा निवडणूक सोबत लढली. तसेच सध्या मुख्यमंत्री पदावरून भाजप – सेनेत मतभेद होत असल्याचे वृत्त आहे. याचदरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सेना – भाजपवर निशाणा साधला.

एकानं डॉक्टर बनायचं तर दूसऱ्यानं पेशंट. आमचं ठरलंय, बिघडलंय हा शिवसेना आणि भाजपचा नेहमीचा खेळ आहे, सेना भाजपच्या या प्रकाराला आता जनता फसणार नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली. इतकेच नव्हे तर, सत्ताधारी कोण आहेत, कसे आहेत, त्यांची वागणूक कशी आहे. हे माहित असल्याकारणाने फक्त अग्रलेखावरच समाधान मानावं, असा अप्रत्यक्ष टोलाही आव्हाड यांनी शिवसेनेला लगावला आहे.

याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्याआधी अफजलखानापासून ते शायिस्तेखानापर्यंत पटक देंगे, उखाड देंगे हे सगळ ऐकल्यानंतर जी काय मगरमिठी शिवसेना-भाजपने मारली ती काय उभ्या आयुष्यात सुटणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.