आबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण – चित्रा वाघ

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याच्या भावना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केल्या आहेत. २००५ साली आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद करण्याचा निर्णय घेतला होता, राज्यातील माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता, पण आज पुन्हा एकदा महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सरकारची मानसिकता किती खंबीर आहे हे पाहणे गरजेचे आहे. दारूचा खप वाढवण्यासाठी दारूच्या बाटलीला महिलांचे नाव देण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले अशी टीका वाघ यांनी सरकारवर केली आहे. बारबालांचा विचार करताना यातून उद्धवस्त झालेल्या घरांचा विचारही सरकारने करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या. डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. तर बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अटही शिथिल करण्यात आली. राज्य सरकारने उगारलेल्या छडीची नको, तर घुंगरांची छमछम व्हावी, यासाठी डान्सबार चालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात डान्सबार चालकांनी केलेल्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. महाराष्ट्र सरकारने कायदे इतके कडक केले आहेत, की आम्हाला डान्स बारचा परवानाच मिळू दिला नाही, असा आरोप डान्स बार चालकांनी केला होता. या कायद्यामुळे महिलांचं शोषण आणि इतर गैरप्रकार रोखले जात आहेत, असा दावा सरकारने केला होता. सुप्रीम कोर्टाने डान्सबारला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने काही ‘संस्कारी’ अटी आणि शर्थी घातल्या होत्या.