पवारांच्या स्वागताला भुजबळ गैरहजर, राजकीय चर्चांना उधान

blank

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार, माजी मंत्री यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजप व शिवसेने मध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य दौऱ्याचे नियोजन करून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार ते आज नाशिक येथे आले.परंतु नाशिकमध्ये त्यांचे थंडपणाने स्वागत झाले.

यावेळी छगन भुजबळांसह राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताकडे पाठ फिरवली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले, त्यावेळी केवळ १०० च्या आत कार्यकर्ते उपस्थित होते.नाशिक जिल्हात पक्षाचे चार आमदार, १८ जिल्हा परिषद सदस्य, नाशिक महापालिकेत ६ नगरसेवक याशिवाय पंचायत समिती सदस्य, नगर पालिकांमध्ये अनेक नगरसेवक, नाशिक, चांदवड, येथे पंचायत समिती सभापती असतानाही त्यातील अनेकांनी पवारांच्या स्वागताकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकी आधीच पक्षाला महागळती लागल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली असून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वयाच्या ७८व्या वर्षातही राज्य दौरा काढण्यासाठी निघालेल्या पवारांच्या प्रयत्नांचे कौतुक होत असले, तरी कार्यकर्त्यांना आता फारशा आशा उरल्या नसल्याचे यातून दिसून आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधान आले होते . त्यातच छगन भुजबळांसह राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळ हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चेला उधान आले आहे.