fbpx

‘आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात’… बीड राष्ट्रवादी मध्ये वातावरण तापल

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने अनेक नवीन नेत्यांना संधी दिली आहे. या यादीत राष्ट्रवादीने शिरूर मधून विलास लांडे यांना डावलून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे तर, दुसरीकडे म्हणजेच बीडमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांना वगळून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता अमरसिंह पंडित यांचे तिकीट कापल्याने बीड राष्ट्रवादीमध्ये घमासान सुरु होण्याची शक्यता वर्वली जात आहे. कारण एकीकडे आज गेवराई येथे संध्याकाळी आयोजित केलेली पक्षाची बैठक रद्द करण्यात आली असून दुसरीकडे अमरसिंह पंडित यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या फेसबुक पोस्टने वातावरण अधिकच तापवले आहे. ‘आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.’ अशी पोस्ट विजयसिंह पंडित यांनी सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर शेअर केली होती. त्यामुळे पंडित यांच्यातील नाराजी समोर आली आहे.

बीड लोकसभा मतदार संघातून आमदार अमरसिंह पंडित हे यंदाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जात होते. दुसरी यादी जाहीर होण्याच्या क्षणापर्यंत अमरसिंह पंडित यांचे नाव निश्चीत मानले जात होते. परंतु दुसऱ्या यादीत पंडीत यांचे नाव डावलून बजरंग सोनावणे याचं नाव जाहीर करण्यात आलं. बजरंग सोनावणे हे भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरुद्ध लढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने अमरसिंह पंडित सारख्या बड्या नेत्याला मागे ठेवून बजरंग सोनावणे यांना बळीचा बकरा म्हणून पुढे केले आहे की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.