आता डोंगरीतील इमारत खेकड्यांनी पाडली सांगा, अजित पवारांचा सरकारला टोला

टीम महाराष्ट्र देशा: कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा दावा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता, हाच धागा पकडत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या डोंगरीतील इमारत खेकड्यांनी पाडली असे सरकारने जाहीर करून टाकावे, असा टोला लगावला आहे. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी इमारती पडत आहेत, यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. लोकांचे जीव जात असताना हे सरकार कठोर निर्णय घेत नाही. खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटल्याच मंत्री खुशाल सांगतात. धरण केवढ खेकड्यांचा जीव केवढा, किती खोट बोलावे, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.

दरम्यान, पार्थ पवार यांच्या पराभवावर प्रथमच भाष्य करताना अजित पवार म्हणाले कि, पार्थच्या पराभवामुळे पवार कुटूंबियांना कोणताही धक्का बसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांच्या पराभवाचे जेवढे दुःख झाले. तेवढेच पार्थच्या पराभवाचे दुःख झाले. लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला असून आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे.