राज्यातल्या पूरस्थितीला सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये नद्यांच्या पाणी गावांमध्ये शिरल्याने हजारो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीला राज्य सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याची टीका केली आहे.

अलमट्टी धरण हे कोयना धरणापेक्षा ४ पटीने मोठं आहे. त्यातल्या पाण्याचा विसर्ग होणं अत्यंत गरजेचं आहे. याबाबतची आगाऊ सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी होती. परिणामी, नद्यांमध्ये पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचा प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या मुख्यालयात बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहायला हवं होतं. सातत्यानं सर्वच धरणांमधल्या पाण्याच्या पातळीचा आढावा घ्यायला हवा होता. त्यामुळे आज राज्यातल्या पूरस्थितीला या सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार आहे,अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

कोल्हापूर, सातारा व सांगलीत पूरस्थिती

मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास ५० हजारांहून अधिक लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. तर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.

भीमा नदी कोपली : २९ गावातल्या साडे सात हजारावर कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं

पूरग्रस्त भागात सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क रहा : फडणवीस