भाजप एवढे थापाडे सरकार बघीतले नाही – अजित पवार

औरंगाबाद: केंद्र आणि राज्यात असणाऱ्या भाजप एवढे थापाडे सरकार याआधी कधीच झालेले नाही. सरकारचा केवळ तारीख पे तारीखचा कारभार चालू आहे. तर भाजपचा जोडीदार पक्ष सत्तेत आहे की विरोधात तेच कळत नसल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मराठवाड्यामध्ये काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेचा आज औरंगाबादमध्ये समारोप होत आहे, यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देण्याच्या करण्यात आलेल्या घोषणेवर टीका करत आता निवडणुका आल्याने सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ असे सांगितले. मग मागचे साडे तीन वर्ष सरकारचे कोणी हात बांधले होते का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

तर एमपीएससीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी दरवर्षी परिक्षा देत असतात. त्यांच्या नोकरीचे दरवाजे सरकारने बंद केलेले आहेत. गरीबांच्या मुलांनी शिकून पुढे येऊ नये, असं या सरकारला वाटतं का? असे खडेबोलही पवार यांनी यावेळी सुनावले आहेत.