ईडी चौकशी झाल्यापासून राज ठाकरेही कमी बोलतायत – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधारी भाजपकडून विरोधी पक्ष नेत्यांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. सरकार ईडीच्या माध्यमातून विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याची टीका होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीवर खळबळजनक विधान केले आहे.

सत्ताधारी भाजपकडून चौकश्या आणि पैशांची भीती दाखवली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ईडीची चौकशी झाल्यापासून बोलायचे कमी झाले आहेत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची देखील चौकशी केली आहे.

सरकारविरोधात भूमिका घेतल्याने राज ठाकरेंच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे, तर काहीही झालं तरी आपला आवाज बंद होणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हंटले होते. आता अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.