‘राष्ट्रवादी पवार नव्हे दलाल चालवतात’ सुरेश धस यांचा हल्लाबोल

उस्मानाबाद : “राष्ट्रवादी पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही. आता पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा अजित पवार पक्ष चालवत नसून, तोडपाणी करणाऱ्या दलालांच्या हातात पक्षाची सूत्रं गेली आहेत”, अशा शब्दात माजी मंत्री सुरेश धस यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली.

सुरेश धस म्हणाले, “गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभे ठाकण्याची राष्ट्रवादीमध्ये कोणातच धमक नव्हती. त्यावेळी आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली. परभणीत बाबाजानी दुर्राणी यांचा बळी दिला गेला, तर उस्मानाबादेत अशोक जगदाळे यांना उमेदवार म्हणून नुसतेच फिरवले. रमेश कराड यांना उमेदवारी देण्याचा नक्की निकष काय?”, असा सवालही धस यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भाजपा, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी आपला उमेदवारी अर्ज आज उस्मानाबाद येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत दाखल केला.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने भाजप आणि राष्ट्रवादी वादात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी प्रसिद्ध होती. ही कांडी फिरताच काही मंडळी उघडपणे तर काही मंडळी आपापल्या पक्षात राहून भारतीय जनता पक्षाला मदत करत असत. तोच खाक्या आता पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविला आहे.

Gadgil