fbpx

राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाला राष्ट्रवादीचा विरोध नाही – मलिक

मुंबई – काँग्रेस २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यास आपण पंतप्रधान पद स्वीकारू, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून टीकेची झोड उठवली जात असताना मात्र दुसरीकडे देशाच्या पंतप्रधान पदासाठी जनतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संधी दिल्यास त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हंटल आहे.

तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वत: पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे त्या पदासाठी आम्ही कधीही दावेदार राहणार नाही असं देखील मलिक म्हणाले.

मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार माजिद मेमन यांनी राहुल गांधी यांच्या या विधानावर हरकत घेत शरद पवार हेच पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार असल्याचा दावा केला होता . भाजप विरोधातील आघाडीसाठी काँग्रेस पूर्वअट घालू शकत नाही, असेही मेमन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. त्यांच्या विधानानंतर राहुल यांच्या पंतप्रधान पदाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याची चर्चा सुरू झाल्याने प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करत आमचा राहुल गांधींना विरोध नसल्याचं सांगितले.