fbpx

नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार, १३ नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पडणार असल्याची शक्यता आहे. कारण नवीन मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादीच अस्तित्व धोक्यात येणार असल्याचं दिसत आहे.

नवी मुंबई हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक प्रतिनधी भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा एक गट भाजप प्रवेशासाठी बैठकांवर बैठका घेत असुन ते १५ ऑगस्टपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

राज्यात आता विधानसभा निवडणुकीचा काळ आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करत आहे. मात्र कॉंग्रेस आघडीच्या नेत्यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण दिवसा अखेर कोणीतरी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. एक बाजूला भाजपला शह देणारी रणनीती आखायची आहे तर दुसऱ्या बाजूला पक्ष सोडून जाणारे नेते सांभाळायचे आहेत. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच दमछाक होत असल्याच दिसत आहे.