राष्ट्रवादीतील गटबाजीला कंटाळून आमदाराचा पक्ष संघटनेतून राजीनामा !

ncp

जळगाव: दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झालेल्या आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पक्षातील वाढत्या गटबाजीला कंटाळून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावे प्रदेश कार्यालयात त्यांनी राजीनाम्याचा फॅक्स पाठवला.

डॉ. सतीश पाटील तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्षपद सांभाळत होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून जिल्हाभरात त्यांचे तालुका दौरे,मेळावे सुरू होते.परंतु पक्षातील असंतुष्टांचे उठाव वाढल्याने त्यांना पक्षीय संघटन वाढवणे अवघड झाल्याची चर्चा पक्षात होती. यामुळे त्यांनी अचानक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

पारोळा, एरंडोल, भडगाव तालुक्यातील काही भाग असा अडीच तालुक्यांचा मतदारसंघ असल्याने जिल्हाभरात दौरेकरताना मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत असल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. पाटील यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. त्यातच नवीन जिल्हाध्यक्ष निवड होईपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास मुरलीधर पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार द्यावा, अशी विनंती आमदार डॉ . पाटील यांनी राजीनाम्यात केली आहे.