कोल्हापूर : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
मात्र, आता या महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. या काळात काँग्रेसची नाराजी, खुद्द काही शिवसेना नेत्यांची धुसफूस, पक्षबदल अशा घटनांना सामोरं जात महाविकास आघाडीचं सरकार मात्र स्थिर राहिलं. येत्या काळात अनेक स्थानिक पातळीच्या निवडणुका राज्यांमध्ये पार पडणार आहेत. यासाठी महाविकास आघाडीतील हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार कि स्वबळावर यावरून चांगलंच राजकारण तापण्याचं चिन्ह आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या जानेवारी महिन्यात होऊ शकते. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून ही राजकारणातील दिशाबदलाची नांदी ठरू शकते असं मत देखील काही राजकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
यासंदर्भात राज्याचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची गर्जना केली आहे. जागा वाटपामध्ये अडचणी येऊन स्थानिक कार्यकर्ते व नेते फुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ते बंड करून विरोधी पक्षाची वाट धरू शकतात आणि त्यामुळेच खबरदारी म्हणून आघाडी न करता स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार असून निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येत येईल असं म्हणत ‘आमचं ठरलंय’ असं सूचक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपला सत्तेत येण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागणार हे मात्र नक्की आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला ड्रायव्हर नको तर मुख्यमंत्री हवा आहे; राणेंची तोफ धडाडली
- ‘माझा सामना, माझी मुलाखत’; हिंदुत्व असेल तर ते दिसत का नाही? : मनसे
- आधी छोटे नेते म्हणाले आणि आता चंद्रकांतदादांनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक
- या सरकारच्या काळात अनेक नैसर्गिक आपत्ती, हे सरकार लवकरच कोसळणार; भाजपच्या माजी मंत्र्याचे भाकित!
- मविआच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी