पुजाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, राष्ट्रवादीची मागणी

उस्मानाबाद : कोरोनामुळे सलग दुसऱ्यांदा तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे परंपरेने पुजारी व्यवसाय करणाऱ्या बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे व्यवहार पूर्ववत होईपर्यंत मंदिर संस्थानने पुजारी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षांकडे केली आहे.

तुळजापूर शहराची अर्थव्यवस्था पूर्णपणे भाविकांवर अवलंबून आहे. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने पुजारी, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानमार्फत मंदिर सुरळीत चालू होईपर्यंत दरमहा वस्तू देऊन मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विवेक शिंदे यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यामार्फत निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

निर्बंधांचा पुनरविचार करावा
अत्यावश्यक सेवेच्या व कडक निर्बंधांच्या गोंडस नावाखाली शासनाने लादलेल्या लॉकडाऊनचा जाहीर निषेध करत या निर्बंधांचा फेरविचार करावा, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. अत्यावश्यक सेवेची अट घालत शासनाने सर्वच व्यवसाय बंद केल्याने व्यावसायिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने पुजाऱ्यांसह व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच दुकाने बंद करण्यात आल्याने बँकाचे हप्ते, गड्यांच्या पगारी, दुकान भाडे, लाईट बिल आदी खर्च कसा भागवायचा? असा सवाल करत राज्य सरकारने लॉकडाऊनचा फेरविचार करावा, लॉकडाऊन बाबत सकारात्मक विचार करण्याची मागणी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या