fbpx

मराठा बांधवांच्या बलिदानातून मिळालेल्या आरक्षणाचे श्रेय घेणे हे कशाचे चाळे, राष्ट्रवादीचा पंकजा मुंडेंना सवाल

परळी : ४८ मराठा समाज बांधवांच्या बलिदानातून मिळालेल्या मराठा आरक्षणाचे श्रेय घेणे हे कशाचे चाळे आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण पौळ, मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, रणजित चाचा लोमटे, मोहनराव सोळंके, विष्णुपंत देशमुख, राजाभाऊ पौळ, तानाजी देशमुख, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, नगरसेवक विजय भोयटे, जयराज देशमुख, युवक अध्यक्ष संतोष शिंदे, महादेवराव नायबळ, संजय जाधव, नितीन निर्मळ, राजाभाऊ निर्मळ, राजाभाऊ गीराम, वैजनाथ कदम, शंकर कापसे, शंकर कोचे, दिनेश गजमल, भारत शिंदे, पद्माकर शिंदे आदींसह कार्यकर्त्यानी याबाबत एक प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

परळी पंचायत समिती इमारत उदघाटन प्रकरणात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षाच्या नेतृत्वाकडे बोट दाखवत छिचोरे चाळे बंद करा, असे वक्तव्य केले ज्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो . संवैधानिक पदावर असताना सात्विक शब्दाचा प्रयोग करून टीका टिपणी स्वागतार्ह आहे. मात्र दुसऱ्याकडे एक बोट करताना आपल्याकडची तीन देखील पहा असा सल्ला दिला आहे.

एका तालुक्याच्या समितीच्या इमारतीच्या श्रेयासाठी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचा थयथयाट समजू शकला जाऊ शकतो . मात्र ज्या मराठा आरक्षणा साठी स्व. अण्णासाहेब पाटील ते काकासाहेब पर्यंत ४८ मराठा बांधवांनी बलिदान दिले , संपूर्ण राज्यात सकल मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले , विविध आंदोलने आणि त्या आंदोलनांला सर्व इतर समुदायांनी दिलेली साथ दिली , कोपर्डी च्या प्रकरणा नंतर तीव्र झालेल्या लढ्याचे हे यश असल्याने कुठले एक सरकार कुठला पक्ष किवा कुठल्या एका नेतृत्वाला मराठा आरक्षणाचे श्रेय देता आणि घेता येणार नाही अशा शब्दात या कार्यकर्त्यांनी सुनावले आहे.

कुठल्या एका नेतृत्वाने आपल्या बगल बच्च्यांना पुढे करून स्वत:ला घोड्यावर आणि श्रेयाच्या खुर्चीत बसवून घेतले हे संपूर्ण समाजाने आणि राज्याने पाहिले . आरक्षण न्यायलयात टिकले तेव्हा लाखो लोकांच्या डोळ्यातून अश्रू त्या बलिदान करणारासाठी निघाले , अनेकांनी आनंद साजरा केला नाही , आमचे नेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर अनेकदा आवाज उठवला तरीही आम्ही हा विजय समाजाचा मानतो , या उलट पालकमंत्री राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी अद्याप कोपर्डी ला भेट दिली का ? याचे त्यांनी उत्तर द्यावे.

आपण मराठा आरक्षण साठी मंत्री मंडळ बैठकीत कुठले राजकीय नाट्य केले हे समाजाने आणि राज्याने पाहिले नाही काय ? असे असताना देखील आपण परळीत आपल्या कार्यकर्त्यांच्या हातून शमशेर कसली घेता , घोड्यावर बसून मराठा आरक्षणाचा सत्कार कुठल्या अधिकाराने घेतला , सरकार म्हणून हा सत्कार होता तर कोपर्डी येथे अद्याप घोषित केलेली पोलीस चौकी , शाळा कुठे आहे याचे उत्तर द्या असे आव्हान दिले आहे.

स्वत:चा सत्कार करून घेणे हा केविलवाणा चाळा हा कसला चाळा होता. आणि आमचे नेते अजित पवार यांची पंचायत समिती ला देखील माझीच एन ओ सी लागते असे म्हणणे जे सनदशीर नाही . आपण त्या खात्याच्या मंत्री आहात , एन ओ सी ग्रामविकास मंत्रालयाची हवी असते पंकजाताई मुंडे यांची नाही . लोकशाही विरोधी चाळे करून नेतृत्वाने पोरकट पणा करू नये असे धनंजय मुंडे यांचे समर्थक यांनी आवाहन केले आहे .